नवी दिल्ली – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीची तीन दिवसांची बैठक आजपासून दिल्लीत सुरू झाली. देशातील विविध ठिकाणच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसबरोबर समझौता करण्याबाबतच्या विषयावर यावेळी प्रामुख्याने चर्चा होणार आहे. कॉंग्रेसबरोबर निवडणूक आघाडी करण्याविषयी पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये दोन गट पडले आहेत.
एक गट कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरा गट अशी आघाडी करण्यास फारसा उत्सुक नाही. तथापि, भाजपच्या विरोधात प्रादेशिक पातळीवर सेक्युलर पक्षांची एकजूट असणे गरजेचे आहे, अशी या पक्षात सर्वसाधारण भावना आहे.
पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी नेत्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसला वगळून अशी आघाडी करता येणे अशक्य आहे.देशातील एकूण सर्वसाधारण राष्ट्रीय स्थिती आणि निवडणुकीचे राजकारण यात फरक आहे तो लक्षात घेणे गरजेचे आहे, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. या विषयावर विस्तृत चर्चा करून राजकीय ठरावाद्वारे पक्ष आपली भूमिका निश्चित करणार आहे. अलीकडेच झालेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा पराभव सहन करावा लागला आहे, त्या पराभवाचे विश्लेषणही या बैठकीत होणे अपेक्षित आहे.