आज मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक

बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्‍यता

मुंबइृ : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. जरी हे बहुमत मिळाले असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून युद्ध रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आज दुपारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. तसेच या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची मतदेखील जाणून घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा कल जाणून घेणार आहेत. तसेच यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

दरम्यान, निकालानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपबरोबर जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले होते. पण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कमी जागांचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेता येणार नाहीत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये शिवसेनेला निम्मा वाटा हवा, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलेच शीतयुद्ध रंगणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here