जयपूर – सध्या जगभर करोनाच्या प्रादुर्भावामुळे “कोव्हिड19’चा फैलाव मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे 95 टक्के नागरिक गेले अनेक दिवस घरातच अडकले आहेत. या सर्वांना साहित्यिक मेजवानी मिळावी आणि त्यांना तेच-तेच सिनेमे, मालिका आणि बातम्या यांमधून रिलीफ मिळावा म्हणून जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलतर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. “ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या नावाने जयपूर लिटरचेर फेस्टीव्हलतर्फे युट्युब चॅनलच्या माध्यमातून दररोज सायंकाळी विविध नामांकित लेखकांच्या मुलाखती, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जात असून, या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत आहे, असे या उपक्रमाचे संयोजन संजोय रॉय यांनी सांगितले.
पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि देखणा साहित्य सोहळा असा लौकीक प्राप्त केलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे यंदा 13 वे वर्ष आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथील डिग्गी पॅलेसमध्ये जानेवारी महिन्यात हा साहित्यसोहळा आयोजित केला जातो आणि प्रतिवर्षी त्याला 5 ते 6 लाख साहित्यप्रेमी भेट देत असतात. आता लॉकडाऊनमुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने या साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी साहित्यप्रेमींसाठी व्हर्च्युअल मुलाखतींचे आयोजन केले आहे.
यामध्ये साहित्यिक आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ऑब्झर्व्हर रिसर्च फौंडेशनच्या समीर सरण यांच्याशी “द न्यू वर्ल्ड डिसऑर्डर- पॅन्डेमिक अँड बियॉन्ड’ या विषयावर बोलताना, वर्ष 1896-97 मधल्या प्लेगच्या साथीविषयी माहिती दिली. तसेच सार्स आणि स्वाईन फ्लूच्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीची आजच्या समस्येशी तुलना केली. यावेळी थरूर यांनी केंद्र सरकार करत असलेल्या उपाय योजनांबद्दल समाधान व्यक्त करत, लॉकडाऊन थोडा लवकरच सुरु करायला हवा होता, असे सांगितले.
“करोना क्रॉनिकल्स’ या चर्चेत सिद्धार्थ मुखर्जी आणि पिटर फ्रॅन्कोपान यांनी जुन्या आणि भावी काळातील जागतिक संसर्गजन्य आजारांविषयी मौलीक चर्चा केली. अन्य मुलाखतींमध्ये, “वॉल्स ऍण्ड ब्रिजेस’ या शीर्षकाच्या कार्यक्रमात “लीला’ कादंबरीचे लेखक प्रयाग अकबर आणि “सिबियस नॉट’च्या लेखिका अमृता त्रिपाठी यांनी समकालीन सामाजिक समस्या, सोशल डिस्टन्सिंग आणि अनेक दिवस एकाच कुटुंबातले लोक एकत्र राहिल्याने निर्माण होणाऱ्या नात्यातील नव्या भावबंधांविषयी चर्चा केली. तर “फ्रीडम ऑफ थॉट’ या शीर्षकांतर्गत कार्यक्रमात हेलेना केनेडी आणि बी रौलेट या पाश्चात्य साहित्यिकांमधली चर्चा रंगली.