पिंपरी – वरळी येथील आरे डेअरीशी संबंधित 1700 दूध वितरक व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दुग्धविकासमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी (दि.10) बैठक पार पडली. दूध वितरक संघटनेचे, राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मागणी वरून ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
दूध केंद्रांवर सकस दुधाचे वाटप व्हावे, खाद्य पदार्थ विक्रीचे परवाने नूतनीकरण करावे तसेच वारसदारांच्या नावावर केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या केंद्र चालकांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
याशिवाय दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, फंडाची देयके मिळालेली नाही, ती देण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांच्या वरळी येथील मोडकळीला आलेल्या घरांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. यावर हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देखील भरणे यांनी दिले आहेत, अशी माहिती यशवंत भोसले यांनी दिली.
या बैठकीला मुंबईमधील दूध वितरक केंद्र चालकांचे व राज्यातील डेअरी कर्मचाऱ्यांचे, राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.