कोविड तपासणी प्रयोगशाळेसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करा – पालकमंत्री

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट; कामांची पाहणी

बुलडाणा : राज्य शासनाने बुलडाणा येथे आरटीपीसीआर (RT PCR ) ही कोविड आजाराचे निदान करणारी प्रयोगशाळा मंजूर केली आहे. प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातच कोविडचे निदान होणार आहे. त्यामुळे आपल्या येथील संशयित व्यक्तींना चाचणी अहवालासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही. प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

जिल्हा स्त्री रूग्णालय अर्थात डेडीकेटेड कोविड केअर हॉस्पिटल येथे टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, डॉ. भुसारी, टाटा ट्रस्टचे श्री. लोणारे आदी उपस्थित होते.

टाटा ट्रस्टने लवकरात लवकर रूग्णालयाचे काम पूर्ण करून रूग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोविड रूग्णांची वाढती संख्या पाहता रूग्णालय लवकर रूग्णसेवेत रूजू करणे गरजेचे आहे. टाटा ट्रस्ट दर्जेदार काम करीत आहे. त्यामुळे एक अद्ययावत रूग्णालय जिल्हावासियांना मिळणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सदर रूग्णालयाचा रूग्णसेवेसाठी प्रभावी वापर करता येणार आहे. येथील प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ राष्ट्रीय हेल्थ मिशन व नियमित स्टाफमधून पुरविण्यात यावे. प्रयोगशाळा लवकर सुरू करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

याप्रसंगी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रयोगशाळा जागा, नर्सिंग रूम, डॉक्टर्स रूम, वाटर ट्रीटमेंट प्लँट व आयसीयू कक्षाची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करीत अडचणीही जाणून घेतल्या.

दृष्टीक्षेपात कोविड रूग्णालय

 • एकूण 104 बेड
  सर्व बेड्सला ऑक्सिजन. नर्स बोलाविण्याची सुविधा
  आयसीयू बेडची संख्या 20, व्हेन्टिलेटरने सुसज्ज
  मेडिकल वेस्ट प्लँट वाटर ट्रिटमेंट प्लँट
  रूग्णालयात वैद्यकीय सेवा देण्यापूर्वीं पीपीई किट घालणे व काढण्याची खास व्यवस्था
  जंतुसंसर्ग टाळण्यासाठी रूग्ण आत जाणे व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र रस्ता
  स्वॅब नमुने तपासणीसाठी ICMR स्टँण्डर्ड प्रमाणे RT-PCR लॅब मंजूर
  रूग्णाच्या आरोग्यविषयक तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी VEDIO CONFERNCING ने सुसज्ज टेलिमेडीसीन विभाग
  संपूर्ण हॉस्पिटलला वातानुकूलन व्यवस्था
  डॉक्टरांसाठी रेस्ट रूम

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.