वैद्यकीय कचऱ्याचा खर्च

प्रशासन व डॉक्‍टर असोसिएशन संबंधितांवर काय कारवाई करणार?

सध्या डॉक्‍टरी पेशाबाबतच लोकांमध्ये कमालीचा असंतोष चुकीच्या प्रवृत्तींमुळे निर्माण झाला आहे. अपवाद वगळता डॉक्‍टर हे सामाजिक बांधिलकी म्हणून न उपचार करता व्यावसायिक दृष्टीकोन ठेवूनच रुग्णांवर इलाज करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे काम या पेशाकडून व्हावे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वाई – पसरणी घाटात बुवासाहेब मंदिर परिसरात मुख्य रस्त्याच्या बाजुलाच अज्ञातांनी कालबाह्य वैद्यकीय औषधांचा साठा रस्त्यावर टाकल्याने वाई शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राज्यासह देश-विदेशातून लाखो पर्यटक वाईहून पाचगणी-महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणी येत असतात. घाटात दुर्मिळ प्रजातीच्या पशु पक्ष्यांचे वास्तव्य आहे. पर्यावरणास धोका पोहोचविण्याच्या कृतीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून तीव्र नाराजी व्यक्त केली. कुंभकर्णाच्या भूमिकेत असणाऱ्या आरोग्य विभागाला आजपर्यंत जाग आलेली नाही हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. आजपर्यंत डॉक्‍टर दवाखान्यातून जनतेच्या जीवाशी उपचाराच्या नावाखाली राजरोसपणे लुटत होते.

आता स्वतःच्या व्यवसायातील घाण रस्त्यावर टाकून त्या परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याने नागरिक गैरकृत्य करणाऱ्या डॉक्‍टरांच्या विरोधात रास्त्यावर उतरून जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. डॉक्‍टरी पेशाला समाजात आजही एक वेगळे स्थान असून त्या पेशाला काळीमा फासण्याचे काम काही डॉक्‍टरांडून करण्यात आल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

ही अतिशय गलिच्छ बाब असून लोकांच्या आरोग्याशी खेळण्यात येऊनसुद्धा याकडे डॉक्‍टर असोसिएशचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या वाई परिसरात पहावयास मिळत आहे. रस्त्याच्या बाजुला सिरींज, प्लास्टिक पिशव्या, बॅंडेज मटेरियल, प्लास्टरचे मटेरीयल अशा दुर्गंधयुक्त धोकादायक कचरा टाकल्याने पसरणी घाटात मुख्य रस्त्यालगत नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे यासारख्या गंभीर विषयावर प्रशासन दोषी डॉक्‍टरांवर कडक कारवाई करणार का? याकडे वाईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.