पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी वर्ग-1 पदांच्या 899 जागा भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली. ही सर्व पदे स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरण्यात येणार आहेत. मात्र, या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग-1 ची महत्त्वपूर्ण पदे स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरणे चुकीचे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही वर्ग 1 व वर्ग 2 या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा असूनसुद्धा स्वतंत्र निवड मंडळामार्फत वर्ग 1 सारखी पदांची भरती करणे संविधानिक नाही.
तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग 1 ची पदे स्वतंत्र निवड मंडळामार्फत न भरता लोकसेवा आयोगामार्फत भरावीत, असा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतल्याचे कळते. त्याच धर्तीवर वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 पदेसुद्धा लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याबाबत निर्णय व्हावा,’ अशी मागणी दरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.