उरुळी कांचनला वैद्यकीय अधिकारी मिळेना!

एक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाढता ताण : साथीचे आजार बळावल्याने रुग्ण वाऱ्यावर

उरुळी कांचन – उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात ठाण मांडून आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राचा भार आता एक अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांवर पडला आहे. गावात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी दोन अधिकारी नेमावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उरुळी कांचनमधील आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. केंद्रात कायम रुग्णांची गर्दी असते. जवळपास असणाऱ्या गावांतील रुग्ण देखील केंद्रात उपचारासाठी येत असतात. कारण उरुळी कांचन हे गाव मोठे आहे. मात्र, सहा महिन्यांपासून केंद्रामध्ये एकच वैद्यकीय आरोग्य अधिकारी कामकाज पाहत आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुचिता कदम व डॉ. संदीप सोनावणे हे कामकाज पाहत आहेत. परंतु पाच महिन्यांपासून डॉ. संदीप सोनावणे हे उरुळी कांचन आरोग्य केंद्रात येत नाहीत. ते जिल्हा परिषद पुणे कार्यालयात असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. संदीप सोनावणे यांची नेमणूक उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात केली आहे. त्याचे मासिक वेतन देखील याच केंद्रातून होत आहे. पाच महिन्यांपासून त्यांनी या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसूनच आपले दिवस भरण्याचे काम करीत आहेत, असे आरोप सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
जिल्हा परिषदेकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे पत्र देण्यात आलेले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे, अशी चर्चा सुरू आहे. रुग्णांची सेवा करण्यापेक्षा वरिष्ठांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्यात त्यांना धन्यता वाटत असल्याचा सूर उमटत आहे.

उरुळी कांचन आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आला आहे; परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत काय विषय आहे, हे सांगता येणार नाही.
– संजय खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी, हवेली.


मला जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी तोंडी सांगितल्यामुळे मी जिल्हा परिषदेत काम करीत आहे.
– डॉ. संदीप सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, उरूळी कांचन.


उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. सध्या तापमान योग्य नसल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डॉ. संदीप सोनवणे हे उरुळी कांचन केंद्रात आले नाही तर जिल्हा परिषदेकडे दुसऱ्या डॉक्‍टरची मागणी तात्काळ करणार आहे.
– किर्ती अमित कांचन, सदस्या, जिल्हा परिषद नियोजन समिती. 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.