पुणे – वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “नीट’ 12 सप्टेंबरला होत आहे. तसेच राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटी दि.4 ते 20 सप्टेंबरदरम्यान होत आहे. एकीकडे पदवीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असताना मेडिकल, इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑक्टोबर उजाडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्यानंतर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशाकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष असते. यंदा निकालात विक्रमी वाढ झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना मेडिकलसह अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. अशा स्थिती या प्रवेशासाठी असणारी प्रवेश परीक्षाच पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी दोन महिने थांबावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला. पण, बारावीत कितीही चांगले गुण मिळाले असतील अभियांत्रिकी, मेडिकल प्रवेशासाठी असणाऱ्या सीईटीत चांगणे गुण मिळणे आवश्यक आहे. त्यावर प्रवेश मिळतो. त्यामुळे सीईटीचे महत्त्व वाढले आहे.
दरम्यान, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश देणे आवश्यक आहे. या परीक्षा दि.4 ते 10 सप्टेंबर आणि 14 ते 20 सप्टेंबर या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या सीईटीची झाल्यानंतर जवळपास 15 दिवसांनी त्याचा निकाल जाहीर केला जातो. त्यानंतरच प्रथम प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. ही सर्व प्रक्रिया ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, नर्सिंग, फिजिओथेरपीसह सर्व वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर होणारी “नीट’ देणे अनिवार्य आहे. ही परीक्षा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी त्याचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या कालावधीचा विचार करता ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत.
पदवीच्या पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. मात्र मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आणखी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी नीट अथवा एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षा विचार करावा. त्यादृष्टीने जास्तीत जास्त सराव परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्यास उपयुक्त ठरेल.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर, करिअर मार्गदर्शक