नवी दिल्ली – होमिओपॅथी आणि भारतीय औषधांसाठीची दोन स्वतंत्र सेंट्रल कौन्सिलच्या फेररचना करण्याच्या दोन विधेयकांना संसदेने आज मंजुरी दिली.
होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल दुरुस्ती विधेयकाद्वारे या कौन्सिलला आणखी एका वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. अशीच तरतूद द इंडियन मेडिसीन सेंट्रल कौन्सिलला मिळणार आहे. ही विधेयके राज्यसभेत या आधीच मंजूर झाली असून काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या लोकसभेच्या कामकाजात या विधेयकांना मंजुरी देण्यात आली.
या संबंधात केंद्र सरकारने या आधीच दोन अध्यादेश जारी केले होते त्याचे आता या निमित्ताने कायद्यात रूपांतर झाले आहे.
या विषयीचा मूळ कायदा हा सन 1973 चा आहे. तो या आधी 2018 मध्ये दुरुस्त करण्यात आला होता. त्यात दर वर्षी सेंट्रल कौन्सिलची पुनर्रचना करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये दर दोन वर्षांनी या सेंट्रल कौन्सिलची फेररचना करण्याची तरतूद करण्यात आली आहे.