वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत अपेक्षित

पुणे – पुण्यातील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचा विचार करून प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरामध्ये महापालिकेच्या मालकीचे वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. त्याविषयी विविध स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या अंदाजपत्रकात तरतूदही केली होती. मात्र, त्यावर कोणताच विचार झालेला नाही. त्याविषयी केलेली आर्थिक तरतूद वर्षाच्या शेवटी नव्हे तर मध्यातच वर्गीकरण केली जात होती. मात्र, यंदा एक पाऊल पुढे टाकत महापालिका प्रशासनाने त्यावर अहवाल मागवला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीतरी त्यावर विचार होऊन मुहूर्तमेढ रोवली जाईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

ही योजना कशाप्रकारे आणि कोठे कार्यान्वित करता येईल आणि त्या अनुषंगाने सर्व बाजूंचा विचार करण्यासाठी महापालिकेने याबाबत तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक केली होती. महापालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांचा सल्लागार यांच्याकडून अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात येणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालयासाठी साडेदहा एकर जागेची आवश्‍यकता असते. महापालिकेकडे पुणे स्टेशनजवळील नायडू हॉस्पीटल येथे साडेबारा एकर जागा आहे. महापालिकेच्या याठिकाणी अनेक इमारती आहेत. त्यामुळे या इमारतीचा पुनर्वापर अथवा पाडण्याची आवश्‍यकता आहे का, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत सहकार्य करावे असे पत्रही महापालिकेच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले आहे.

12 प्रकारच्या परवानग्या आवश्‍यक
सल्लागाराचा अहवाल प्रशासनाला मिळाल्यानंतर, याला मान्यता घेण्यात येईल. एखादे वैद्यकीय महाविद्यालय सुरू कारायचे असल्याच 12 प्रकारच्या परवानग्या आवश्‍यक आहेत. अहवाल ही सुरुवात असून, प्रशासनाची अंतर्गत बाब आहे. प्रशासनांतर्गत निर्णय झाल्यानंतर अन्य परवानग्या घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये महाविद्यालय सुरू करावयाचे असल्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलची मान्यता आवश्‍यक असते. त्यांच्या नियमाप्रमाणे सर्व सोयीसुविधा असणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच सल्लागाराचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबी स्पष्ट होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.