मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन आचारसंहितेपूर्वी होणार

पालकमंत्री विजय शिवतारे यांची माहिती पदनिर्मितीचा लवकरच निर्णय

सातारा – बहुचर्चित आणि जिल्ह्याची गरज असलेल्या मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी होणार, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. मेडिकल कॉलेजच्या पदानिर्मितीच्या प्रस्तावाला पुढील आठवड्यात मंजुरी मिळेल आणि तद्‌नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाशी मेडिकल कॉलेज संलग्न करून प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करण्यात येईल, असे शिवतारे यांनी सांगितले.

साताऱ्यात टंचाई आढावा बैठकीनंतर ना. शिवतारे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते.
यावेळी शिवतारे म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या पदानिर्मितीचा प्रस्ताव सरकारकडे सादर झाला आहे. पुढील आठवड्यात प्रस्तावाला मंजुरी मिळेल. कृष्णानगर, सातारा येथे संपादित करण्यात आलेल्या 25 एकर जमिनीवर मेडिकल कॉलेजची इमारत उभारण्यात येणार आहे.

इमारतीचे भूमीपूजन आचारसंहिता लागण्यापूर्वी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे पदानिर्मितीला प्रस्तावाला मंजुरी मिळताच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

दरम्यान, साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दै. प्रभातने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मंगळवार दि. 28 च्या अंकात देखील मेडिकल कॉलेजच्या कामाला गती मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर बुधवारी सातारा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन लवकरच होणार, असे जाहीर केल्याने जिल्हावासियांमध्ये साहजिकच आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मात्र, केवळ भूमीपुजनावर आनंदीत न राहता कॉलेजच्या इमारतीचे उद्‌घाटन होईपर्यंत दै. प्रभात पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.