सातारा – साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वाईतील मराठी विश्वकोशाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
वाई येथे नव्याने अद्ययावत मराठी विश्वकोश कार्यालयाची इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठीची तरतूद या वेळच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी युवकांना जल, कृषी केंद्र, साहसी पर्यटनाला महत्व देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या पर्यटन क्षेत्राला याचा लाभ होईल. ग्रामपंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे विजेची बचत होणार आहे. याशिवाय महाबळेश्वर तालुक्यातील मधाचे गाव मांघरच्या धर्तीवर राज्यभर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचा फायदा सातारा, वाई, जावळी, पाटण तालुक्यांतील शेतकऱ्यांना होईल. नैसर्गिक साधन संपदा भरपूर असल्याने त्याचा फायदा साताऱ्याला होईल.
मराठी भाषेच्या प्रचारासाठी मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्यात येणार असून पुस्तकांचे गाव भिलारला याचा फायदा होईल. याशिवाय आशियाई बॅंक प्रकल्पातून होणाऱ्या रस्त्याचा मिळणारा निधी, रस्ते, पुल, मोऱ्या, जिल्हा व ग्रामीण मार्ग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मातोश्री पानंद रस्त्यासाठी ही मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्याला निधी उपलब्ध झाला आहे.पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या योजनेतून महाबळेश्वर,पाचगणी ला पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.