महापालिका घालणार केंद्राला साकडे

वैद्यकीय महाविद्यालयासाठी 1 महिन्यांची वाढीव मुदत मागणार

 

पुणे – महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाने मान्यता देत आवश्‍यकतेचे प्रमाणपत्र दिले आहे. असे असले तरी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पथकाने पाहणी करून आपला अंतिम अहवाल देणे आवश्‍यक आहे.

त्यानंतरच महापालिकेस या अहवालासह महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत भारतीय वैद्यकीय परिषदेकडे जाणे अपेक्षित आहे. मात्र, पुढील पाच दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास महाविद्याल पुढील शैक्षणिक वर्षात सुरू करता येणार नाही. त्यामुळे, पालिकेच्या प्रस्तावास 1 महिना मुदतवाढ देण्याची मागणी केंद्राकडे केली जाण्याशी शक्‍यता आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात महापालिकेस वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असल्यास भारतीय वैद्यकीय परिषदेकडे आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच राज्य शासनाच्या मान्यतेसह प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी जाणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने अवघ्या दोन आठवड्यांत आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय तसेच राज्य शासनाची मान्यता मिळणे आवश्‍यक आहे.

महापालिकेने अवघ्या एका आठवड्यात या मान्यता मिळविल्या आहेत. त्यानंतर आता हा प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी केंद्राकडे पाठवायचा आहे. मात्र, त्यापूर्वी महापालिकेस नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून महापालिकेच्या महाविद्यालयाच्या सुविधांची तपासणी करणे आवश्‍यक आहे. शासनाची मान्यता मिळताच महापालिकेने विद्यापीठास विनंती करून गुरुवारी या पथकास पुण्यात येण्याची विनंती केली असून त्यानुसार हे पथक दाखल होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.