पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या “नीट’ परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी पात्र होण्याच्या संख्येत त्रिपुरानंतर महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
राज्यातील वैद्यकीयच्या सुमारे 8 हजार प्रवेशासाठी 80 हजार विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे यंदा कटऑफ 10 गुणांनी वाढला आहे. त्यामुळे यंदा नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नॅशलन टेस्टिंग एजन्सीद्वारे शुक्रवारी सायंकाळी निकाल जाहीर झाला. त्यात देशभरातून 7 लाख 71 हजार 500 विद्यार्थी पात्र ठरले.
देशात सर्वाधिक पात्र विद्यार्थी संख्या त्रिपुराची असून, त्याची संख्या 88 हजार 889 इतकी आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. नीट पात्र विद्यार्थ्यांची संख्या 40.91 टक्के इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत 1 टक्का वाढला आहे.