नवी दिल्ली – ऑक्सफर्ड – ऍस्ट्राझेन्सा करोना विषाणु प्रतिबंधक लस कोवीशिल्ड येत्या 73 दिवसांत उपलब्ध होईल, असे काही माध्यमांत प्रसिध्द झालेले वृत्त पुर्णत: चुकीचे आणि काल्पनिक असल्याचे स्पष्टीकरण सीरम इन्स्टिट्यूटने दिले आहे. सध्या देशात या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्यातून त्याची परिणामकारकता आणि रोगप्रतिकारकता सिध्द झाल्यानंतर त्याच्या भारताततील उत्पादनाबाबत नेमकेपणाने सांगता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
सध्या कोविशिल्डच्या बाबत केले जाणारे सर्व दावे विपर्यस्त आहेत. आम्हाला सरकारने लसी उत्पादन आणि भविष्यासाठी साठा करण्याची परवानगी दिली आहे, असे सीरमने आपल्या तीन पानी निवेदनात स्पष्ट केले आहे.
सध्या ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेन्काच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्याचे निकाल आल्यावर आणि आवश्यक परवानगी मिळाल्यावर उत्पादन सुरू करण्यात येईल. चाचणीचे निकाल सकारात्मक आल्यानंतर सीरमकडून अधिकृतपणे उत्पादनाची घोषणा करण्यात येईल.