यंत्रणा एकाच ठेकेदाराच्या हाती

-शहरातील पाणीपुरवठ्याची
-मनमानीमुळे कृत्रिम पाणीटंचाई; कार्यकारी अभियंत्याच्या विरोधात ठेकेदार एकवटले

पिंपरी – शहराला सध्या पाणीटंचाई आणि पाणी कपात या समस्या भेडसावत असताना आणखी पाणी पुरवठ्याची बहुतांश कामे एकाच ठेकेदाराला दिली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील बहुतांश कामे एकाच ठेकेदाराला संगनमताने दिली जात असल्याच्या विरोधात पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी एकत्र येत कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी केली. रामदास तांबे हे मनमानी करत शुभम उद्योग या एकाच ठेकेदाराला संगनमताने कामे देत असल्याने पाणीपुरवठ्याची सर्व सूत्रे एकाच ठेकेदाराकडे एकवटल्याचा आरोपही या ठेकेदारांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून रामदास तांबे हे काम पहात आहेत. ब, ड, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारी सर्व पाणीपुरवठ्याची कामे तांबे हे त्यांच्या मर्जीतील शुभम उद्योग या एकाच ठेकेदाराला देत असल्याचा आरोप या ठेकेदारांनी केला आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांत वेगवेगळ्या आणि संबंधित ठेकेदाराच्या फायद्याच्या अटी व शर्ती ठेवल्या जात असून आयुक्‍तांचीही दिशाभूल केली जात असल्याचा आरोप या ठेकेदारांनी केला आहे.

याबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले असून तांबे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. शुभम उद्योग या ठेकेदाराकडे पंप ऑपरेटर, वॉलमन, पाणी टाकी परिचलन, पंप हाऊस परिचलन तसेच सर्व प्रकारच्या मेन्टनन्स्‌ची कामे आहेत. वरील चार प्रभागातील किमान 90 टक्‍क्‍यांहून अधिक कामे या ठेकेदाराकडे आहेत. धरण शंभर टक्के भरलेले असतानाही महापालिकेच्या पाणीवाटपाचे काम एकाच ठेकेदाराकडे एकवटल्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोपही या ठेकेदारांनी केला आहे.

ठेकेदारांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे यासाठी तांबे स्वत: जातीने लक्ष घालतात. ठराविक ठेकेदारास काम कसे मिळेल याबाबत नेहमी प्रयत्न करतात. या ठेकेदाराच्या हिताच्याच अटी व शर्ती ठेवल्या जातात, इतर ठेकेदारांना चुकीची वागणूक दिली जाते. तसेच तांबे हे या ठेकेदाराचे भागीदार असल्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राजेश इंजिनअरर्स ऍण्ड कंपनी, संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, जनसेवा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, श्री साई स्वयंरोजगार सहकारी संस्था या ठेकेदारांनी आयुक्‍तांकडे ही तक्रार केली आहे. याबाबत शुभम उद्योगचे बाळू वाघेरे यांच्याघह भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

… पाणीपुरवठा बंद होईल – खाडे
शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियंत्रण, मेन्टेनन्स्‌ची कामे, वॉलद्वारे पाणी सोडणारे कामगार, पाण्याच्या टाक्‍यांची सफाई तसेच पंप ऑपरेटर ही सर्व कामे शुभम उद्योग या कंपनीकडे आहेत. जर या ठेकेदाराने ठरविले तर शहराला वेठीस धरून पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, अशी भीती जनसेवा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे धनाजी खाडे यांनी व्यक्‍त केली.

अद्याप मला माहिती मिळाली नाही – रामदास तांबे
विविध ठेकेदारांनी एकत्र येऊन केलेल्या आरोपाबाबत कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्याशी संपर्क साधला असता आपणाला अद्यापपर्यंत याबाबत अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे ते म्हणाले. महापालिका नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबवित असून स्पर्धेद्वारे जो ठेकेदार योग्य ठरतो, त्यालाच कामे दिली जातात. अशा प्रकारे कोणालाही संगनमताने काम देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचा दावाही तांबे यांनी यावेळी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.