नगर -करोनाचा कहर सर्वत्र वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुरुषांबरोबरच महिला रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक कोविड वॉर्डात महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस सुरेश विद्ये यांनी केली.
या संदर्भात विद्ये व माजी जिल्हाध्यक्ष गीता गिल्डा यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. महाराष्ट्रात अनेक कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोविडमध्ये महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करुन प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेश द्यावेत, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्रय महिला सिक्युरिटी कार्ड कोविड सेंटरमध्ये नेमण्यात यावेत, अशी भूमिका विद्ये व गिल्डा यांनी मांडली.
मनपाचे प्रभारी उपायुक्त संतोष लांडगे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालयासही निवेदन देण्यात आले. गरोदर महिलांची बाळंतपणे खासगी डॉक्टर्स त्यांच्या रुग्णालयात करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे गरोदर महिलांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. गरोदर महिलांची सर्व प्रसुतीगृहाच्या डॉक्टरांना अडवणूक न करता बाळंतपण करण्याच्या सूचना करण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.