पुणे – इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या उपाययोजनांना गती देऊन त्या कालबद्ध रितीने पूर्ण कराव्यात. या उपाययोजनांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अधिकारी, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषद आणि देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे, वारकरी डी. डी. भोसले पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सर्व नगरपरिषदांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा घालून त्याप्रमाणे कामाला गती देणे आवश्यक आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या एसटीपीच्या अनुषंगाने रेल्वे क्रॉसिंगबाबत परवानगीसाठी गतीने पाठपुरावा करण्यात येईल. तळेगाव येथील कार्यान्वित न होऊ शकलेल्या एसटीपीचा क्षमतावाढीचा आराखडा तयार करावा. देहू नगरपंचायतीनेही अल्पमुदतीच्या उपाययोजना तत्काळ पूर्ण कराव्यात. आळंदी येथील एसटीपी विहित कालमर्यादेत पूर्ण करावा, अशी सूचनाही डॉ. देशमुख यांनी केली.