तात्पर्य – सुपरफास्ट युगाच्या उंबरठ्यावर

महेश कोळी (संगणक अभियंता)

टू-जी आणि थ्री-जीचा जमाना मागे पडून आज आपण फोर-जी नेटवर्क वापरत आहोत. वीस वर्षांपूर्वीच्या दिवसांची तुलना केल्यास आज इंटरनेटचा वेग प्रचंड वाढला आहे. हाच वेग आणखी वाढवून इंटरनेट सुपरफास्ट आणि सुपरस्मार्ट बनविण्यासाठी आता फाइव्ह-जी नेटवर्क येत आहे. हे नेटवर्क आल्यानंतर आपल्या जीवनात मोठे फेरबदल होणार असून, त्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच कुतूहल आहे.

सुमारे वीस वर्षांपूर्वी ई-मेलवर आलेला एक फोटो डाउनलोड करायला किती वेळ लागत असे, हे आता आपल्या विस्मृतीत गेले. परंतु बऱ्याच क्षेत्रांमधील शास्त्रज्ञ, संशोधकांना अभ्यासासाठी योग्य फोटो डाउनलोड करून घेण्यासाठी तब्बल अर्धा-पाऊण तास थांबावे लागत असे. अनेकदा यापेक्षाही अधिक वेळ लागत असे. उदाहरणार्थ, जलवायू परिवर्तनाच्या क्षेत्रात संशोधन करायचे असल्यास क्‍लोरो-फ्लोरो कार्बन वायू हे या परिवर्तनाचे कारण मानले जाते. वातावरणात धूर आणि धूळ यांचे प्रमाण किती आहे, हे समजल्यास क्‍लोरो-फ्लोरो कार्बनची सद्यस्थिती कळू शकते. परंतु वातावरणातील धूर आणि धुळीचे उपग्रहावरून घेतलेले छायाचित्र डाउनलोड करण्यासाठी नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात तासन्‌तास वाट पाहावी लागे. एखाद्या फोटोची फाइल हेवी असेल, तर रात्रभर डाउनलोडिंगला लावून तो फोटो सकाळी पाहावा लागत असे. परंतु इंटरनेटविषयी माहिती नसलेल्या व्यक्तीला ही प्रक्रिया इतके तास कशी चालते, याचे आश्‍चर्य वाटत असे.

आज एखादा फोटोच नव्हे तर एखाद्या चित्रपटाचा संपूर्ण व्हिडिओ डाउनलोड होण्यासाठीसुद्धा संपूर्ण रात्रभर वाट पाहावी लागत नाही. ज्यांनी तो काळ पाहिला नाही, त्यांना फोटोच्या डाउनलोडिंगसाठी एवढा वेळ लागत असे, हे सांगून पटणारसुद्धा नाही, इतके गतिमान इंटरनेट आपण सध्या वापरत आहोत. टू-जी, थ्री-जीचा जमाना मागे पडून आज आपल्या हाती फोर-जी नेटवर्क आले आहे. वीस वर्षांपूर्वीच्या इंटरनेटशी तुलना केल्यास हा वेग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आज एखादी गोष्ट डाउनलोड होण्यास एक तास लागेल, हे वाक्‍यही कुणी ऐकू शकणार नाही. परंतु 1999-2000 मध्ये इंटरनेट त्याच वेगाने चालत असे. मेल पाठविण्यासाठीही वेळ लागत असे. त्यातच एखादी ऍटॅचमेन्ट पाठवायची असेल, तर ती ऍटॅच करण्यासाठीही तासन्‌तास वाट पाहावी लागे. आता ही कल्पनाही कुणी करू शकणार नाही.

आजच्या नव्या पिढीला आपण संगणकीय पिढी म्हणतो. या पिढीसाठी सध्याचा इंटरनेटचा वेगही तुलनेने कमीच आहे. या पिढीला आणखी गतिमान नेटवर्क हवे आहे. कारण आता इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. आजची नवी पिढी इंटरनेटच्या सध्याच्या वेगाविषयीही सातत्याने नाराजी व्यक्त करताना दिसते. त्यांच्या कामाचा वेग प्रचंड आहे आणि पदोपदी इंटरनेटची गरज लागते. परंतु अशा गतिमान कामांसाठी लागणारे गतिमान इंटरनेट लवकरच आपल्याकडे अवतरणार आहे. युवा पिढीची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार असून, इंटरनेट युगात प्रवेश केल्याचा खराखुरा आनंद आता आपल्याला लवकरच घेता येईल. इंटरनेटची पाचवी पिढी म्हणजेच फाइव्ह-जी नेटवर्क अगदी उंबरठ्याशी येऊन ठेपले आहे.

फाइव्ह-जी नेटवर्कचा वेग सध्याच्या इंटरनेटच्या वेगाच्या 2000 टक्‍क्‍यांनी अधिक असणार आहे. हो, अगदी बरोबर… आजच्यापेक्षा 2000 टक्के अधिक वेगवान इंटरनेट! फाइव्ह-जी नेटवर्कचा वेग इतका कमालीचा असेल की, दैनंदिन कामे कल्पनातीत वेगाने होऊ लागतील. त्यावेळी तर एके काळी इंटरनेटचा वेग किती कमी होता, याचा अंदाजही लावणे शक्‍य होणार नाही. डोळ्यांची पापणी लवण्यापूर्वीच एखादा फोटो किंवा व्हिडिओ आपण एखाद्याला पाठविला असेल आणि तो डाउनलोडही झालेला असेल. एक उदाहरण घेऊन आपण ही कल्पना करून पाहू. सध्या दोन तासांचा एचडी चित्रपट संपूर्ण डाउनलोड होण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ लागतो. परंतु जेव्हा फाइव्ह-जी नेटवर्कच्या साह्याने तो डाउनलोड केला जाईल, तेव्हा त्यासाठी अवघे काही सेकंद लागतील. आपल्या घरात इंटरनेटवर चालणारे जेवढे डिव्हाइस असतील, ते सर्व प्रचंड वेगाने कार्यरत होतील.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, इंटरनेटच्या वापरासंदर्भातील आपल्या कल्पनाच फाइव्ह-जी नेटवर्कच्या आगमनाने पूर्णतः बदलून जाणार आहेत. फाइव्ह-जी आल्यानंतर व्हर्च्युअल रिऍलिटी आणि एआरपी म्हणजे ऑग्युमेन्टेड रिऍलिटीच्या माध्यमातून व्यवहारात अनेक गोष्टी बदलून जातील. फाइव्ह-जी नेटवर्क आल्यानंतर इंटरनेटवरील गेमिंगची अशी एक दुनिया आपल्यासमोर उभी राहील, जिची कल्पनाही आपण आजवर केलेली नाही. आजमितीस शहरातील एका सक्रिय व्यक्तीचे दैनंदिन जीवन जितके गतिमान असते, तो जितक्‍या स्मार्टपणे सर्व कामे करतो, त्याच्या 1000 पट वेगाने तो अधिक स्मार्ट वर्क करणार आहे. फाइव्ह-जी आल्यानंतर घराची संरक्षण प्रणाली, प्रकाशयोजना आणि इंटरनेटशी जोडलेली तमाम उपकरणे म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानावर चालणारी सर्व उपकरणे जादूच्या वस्तूंप्रमाणे भासू लागतील, इतकी ती बदलून जातील. गडबडीत घराबाहेर पडल्यास दिवसभर आपल्याला अनेक प्रकारची टोचणी लागते. फ्रीज नीट बंद केला आहे की नाही, दिवे सुरू आहेत की बंद आहेत, दरवाजा नीट लावलेला आहे की नाही, असे प्रश्‍न आपल्याला सतावत असतात. फाइव्ह-जी आल्यानंतर ही सर्व कामे मानवविरहित तंत्रज्ञान अत्यंत स्मार्टपणे आणि व्यावसायिक कौशल्याने करू शकणार आहे.

म्हणजेच, फाइव्ह-जी नेटवर्क आपल्या दैनंदिन जीवनाचे स्वरूपच बदलून टाकणार आहे, आपले अनुभवविश्‍व बदलून टाकणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. जगण्याच्या पद्धतीच बदलून जाणार आहेत. विशेषतः युवकांना फाइव्ह-जी नेटवर्क खूपच पसंत पडणार आहे. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट वेगाने व्हावीशी वाटते. त्यांना तासाचे काम मिनिटांत करून हवे असते, तर मिनिटांचे काम त्यांना काही सेकंदात व्हावे असे वाटत असते. ही गोष्ट आज कपोलकल्पित वाटत असेल; परंतु फाइव्ह-जी नेटवर्कच्या आगमनाबरोबर ती सत्यात उतरलेली असेल. हे नेटवर्क आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता केवळ काही महिनेच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आजच्यापेक्षा 1000 टक्के अधिक वेगाने आपण व्हिडिओ एकमेकांना शेअर करू शकणार आहोत. साधारणपणे यावर्षी डिसेंबरपर्यंत फाइव्ह-जीचे भारतात आगमन होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यावेळी ते येऊ शकले नाही तर 2020 मध्ये तरी ते हमखास येणारच आहे. सेवाक्षेत्रांमधील कामाचा वेग तब्बल 20 पटींनी वाढविणारे हे नेटवर्क असून, त्यामुळे कामाचा वेगही वाढवावा लागणार असला, तरी कमालीच्या कुतूहलाने या नेटवर्कची वाट पाहिली जात आहे. फाइव्ह-जी नेटवर्क आपले संपूर्ण जीवनच बदलून टाकणार असून, कामाची शैली, इंटरनेटचा वापर, वस्तूंचा वापर हे सर्वकाही बदलणार असल्यामुळे हे नेटवर्क जितक्‍या गतीने चालते, तितक्‍याच गतीने प्रतीक्षेचा कालावधी संपावा, असे सर्वांना वाटत असल्यास त्यात नवल नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.