कर्मचाऱ्यांशी संबंध ठेवल्याचा ठपका ठेवत कंपनीकडून कारवाई
वॉशिंग्टन : मॅकडोनाल्ड या जगप्रसिद्ध फास्टफूड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह ईस्टरब्रूक यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. कंपनीतील कर्मचाऱ्याशी परस्परसहमतीने संबंध ठेवल्याच्या कारणावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी कंपनीकडून या घडामोडींबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात आली. कोणत्या कर्मचाऱ्याशी ईस्टरब्रूक यांनी संबंध ठेवले याची माहिती देण्यात आलेली नाही.
पदावरून पायउतार होण्यापूर्वी स्टीव्ह ईस्टरब्रूक यांनी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला. त्यामध्ये त्यांनी आपले एका कर्मचाऱ्याशी संबंध असल्याचे मान्य केले आणि आपण चूक केल्याचेही सांगितले. संचालक मंडळाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे आणि मी आता या पदावरून पायउतार होतो आहे, असे त्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल अंतर्गत चौकशी केल्यानंतर मॅकडोनाल्डच्या संचालक मंडळाने स्टीव्ह ईस्टरब्रूक यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या संचालक मंडळावरील पदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. स्टीव्ह ईस्टरब्रूक हे फेब्रुवारी 2015 पासून मॅकडोनाल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मॅकडोनाल्डच्या संचालक मंडळाने आता ख्रिस केम्पजिन्स्की यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.