नवी दिल्ली : भारताची प्रख्यात बॉक्सर आणि सहावेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या एमसी मेरी कोम हीची देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तर ऑलंम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी फुलराणी पीव्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
भारतीय क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या नावांची शिफारस गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये केली होती. मेरी कोमला 2013मध्ये पद्मभूषणने गौरवण्यात आले होते. तर पद्मश्री तिला 2006मध्ये मिळाली होती. सिंधू यांची या पुरस्कारासाठी 2017 मध्ये शिफारस करण्यात आली होती. मात्र त्यावेळी तिला तो मिळाला नव्हता. तिला 2015मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
प्रख्यात क्रिकेटपटू जहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.