खासगी परीक्षांद्वारे “एमबीए’ प्रवेशाचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयाने उठवली बंदी

पुणे – बनावट गुणपत्रिकाच्या पार्श्‍वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाने “एमबीए’ प्रवेशासाठी ऍटमा, जी-मॅट, मॅट आणि झॅट या चार खासगी प्रवेश परीक्षांद्वारे महाराष्ट्रात प्रवेश घेण्यावर बंदी घातली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली असून, ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना “एमबीए’ला प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत राज्यात “एमबीए व एमएमएस’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. राज्य शासनातर्फे घेण्यात येणारी “एमबीए सीईटी’सह “कॅट’, “सीमॅट’ या शासकीय परीक्षांसह खासगी संस्थांतर्फे घेण्यात येणाऱ्या जीमॅट, झॅट, मॉट आणि ऍटमा या चार परीक्षांचाही समावेश आहे. राज्यात 2018-19 मध्ये 26 जणांनी ऍटमाचे बनावट गुणपत्रिका देत प्रवेश घेतला होता. तर, 2019-20 मध्ये 29 जणांनी प्रवेश घेतला. त्यामुळे खासगी संस्थांद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेतून राज्यात एमबीएला प्रवेश दिले जाणार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, यासंदर्भात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ऍटमा, जी मॅट, मॅट आणि झॅट या चार खासगी संस्थांच्या प्रवेश परीक्षांद्वारे प्रवेशावरील बंदी उठवली असून, 2020-21 या वर्षात प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे एमबीएला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि शैक्षणिक संस्थांना प्रवेशाचा कोटा पूर्ण होणे शक्‍य होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.