मुंबई – करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद आहेत. यावरून सुरुवातीला भाजपनेते आक्रमक झाले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील मंदिरं खुली करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावरून मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला. खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.
राज्यातील मंदिरं सुरू केली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला. त्यावर घंटानाद करा नाही तर आणखी कसलाही नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असा इशारा महापौर पेडणेकर यांनी मनसेला दिला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
राजकीय पोळ्या भाजून घेणारे, आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहित आहे. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, अशी टीका पेडणेकर यांनी केली.
यावेळी पेडणेकर यांनी मनसेनेते संदीप देशपांडे यांच्या रडतानाच्या व्हिडीओचा देखील उल्लेख केला. तेव्हा ते रडत होते. आता दहीहंडी उत्सवात गर्दी करण्यासाठी लोकांना उकसवत आहेत. यांचं तेव्हाचं वागण खर की आताचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.