कोथरूड : पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचे कोथरूड भागामध्ये जल्लोष पूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. कोथरूडमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
कोथरूडला महापौरपद मिळाल्याने पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून दिवसभर आनंद व्यक्त केला जात होता. शुक्रवारी महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता मोहोळ यांचे कोथरूड भागात आगमन झाले. फटाक्यांच्या आतेषबाजीत ढोल-ताशाच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर पदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आल्यापासूनच मोहोळ यांच्यावर समाज माध्यमांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. महानगरपालिकेतील निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मोहोळ यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व त्यांच्या मित्रपरिवाराने कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.