पिंपरी – रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत असल्याबाबतची महापौर उषा माई ढोरे यांनी 11 डिसेंबर रोजी फेसबुकवर पोस्ट केली होती. मात्र “महापौरांची ती पोस्ट ठरली फुसका बार’ या शिर्षकाखाली दै. “प्रभात’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर महापौरांच्या “त्या’ पोस्टमधील शहरातील पोलिसांचे फोन नंबरचा तक्ता व माहिती हटविण्यात आली आहे.
हैद्राबाद येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा जाळून टाकण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर उषा माई ढोरे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेतली. तसेच पोलीस आयुक्तांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत निवेदनही दिले. निवेदन देतानाचा फोटो महापौरांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकले. त्यामध्ये रात्री नऊ ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घरी सोडविण्यास महिलांनी खालील नंबरवर संपर्क साधावा. पोलीस प्रशासनाने दिलेल्या या सुविधेबाबत त्यांचे मनापासून आभार मानले होते. तसेच शहरातील पोलीस ठाण्यांचे क्रमांकही दिले होते. याबाबत पोलीस आयुक्तांना विचारले असता अशी कोणतीही सुविधा दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे “महापौरांची ती पोस्ट ठरली फुसका बार’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले.
दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापौरांच्या त्या पोस्टमधून शहरातील पोलीस ठाण्यांचे क्रमांक असलेला फोटो काढून टाकण्यात आला आहे. मात्र, पोलीस आयुक्तांना निवेदन देताना तसेच महिलांच्या सुरक्षिततेची माहिती देणारी पोस्ट मात्र कायम ठेवली आहे. यामुळे महिलांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.