महापौर आरक्षणाची सोडत ऑगस्ट अखेरपर्यंत!

पुणे – पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत या महिना अखेरपर्यंत होणार आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची माहिती राज्य सरकारने मागविली आहे. सन 2001 पासूनचा आरक्षणाचा तपशील बुधवार (दि. 7)पर्यंत नगरविकास खात्याकडे पाठवावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने माहिती पाठवली आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत नवीन महापौर आरक्षणाची सोडत निश्‍चित होईल, त्याच्यानंतर महापौरपदाची संधी कोणाला मिळणार, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात येत असलेल्या महापालिकांच्या आयुक्‍तांनी नगरविकास खात्याकडे नवीन आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात माहिती पुण्यासह 27 महापालिकांना मागितले आहे. त्यानुसार महापालिकेने 2001 पासूनचा आरक्षणाचा सविस्तर तपशील राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे बुधवारी (दि.7) पाठविला आहे.

पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक यांची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असल्याने गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शहरात निर्विवाद बहुमत मिळविले. महापौरपदाच्या सोडतीमध्ये शहराचे महापौरपद सर्वसाधारण (महिला) गटाला मिळणार हे स्पष्ट झाल्याने भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून मुक्‍ता टिळक यांना पक्षाने संधी दिली. भाजप सत्तेवर येण्याआधी अधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी महापौरपदासाठी निश्‍चित केला होता. त्यामुळे 2012-17 या कालावधीत राष्ट्रवादीकडून अनुक्रमे वैशाली बनकर, चंचला कोद्रे, दत्ता धनकवडे आणि प्रशांत जगताप यांना संधी मिळाली.

भाजपने पिंपरीच्या महापौरपदात बदल केला; परंतु पुण्याचे महापौरपद टिळक यांच्याकडेच कायम ठेवले. येत्या सप्टेंबरमध्ये टिळक यांची अडीच वर्षांची मुदत संपणार आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी महापौर कोण होणार, या बाबतचे चित्र सोडती नंतर स्पष्ट होईल.

ओबीसी (पुरुष) की अनुसूचित जाती (एससी)
महापालिकेच्या 2012-17 या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षांत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातील महिलांसाठी महापौरपद राखीव होते. तर, त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये ते सर्वसाधारण गटासाठी खुले झाले. सध्या ते सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने आता पुढील टप्प्यात तेथे ओबीसी (पुरुष) की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याविषयी उत्सूकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.