गायरानाचा प्रश्‍न सुटल्याने समाविष्ट गावात विकासाची गंगा – महापौर जाधव

पिंपरी – भोसरी मतदारसंघातील दिघी, तळवडे, चिखली, मोशी परिसरातील सुमारे 300 कोटींची 27 हेक्‍टर गायरान जागा महापालिकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे या जागेत शाळा, उद्यान, पोलीस ठाणे, अग्निशामक केंद्र, रुग्णालये, पाण्याची टाकी अशी विविध विकास कामे करता येतील. महापालिकेत समाविष्ट गावात विकासाची गंगा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.

चिखली येथे आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीत महापौर जाधव बोलत होते. जाधव पुढे म्हणाले की, महापालिका अस्तित्वात आल्यापासून भोसरी विधानसभा मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हा प्रश्‍न सोडविता आला नाही. जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली नसल्याने समाविष्ट गावातील विकासकामांना खीळ बसली होती. निधी असूनही केवळ जागे अभावी अनेक विकासकामे रखडली होती. गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, बैठका घेतल्या.

भोसरी मतदारसंघात पिंपरी महापालिकेच्या हद्दीत 13 शासकीय गायराने असून, गायरान व्याप्त क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यास या ठिकाणी चांगले लोकाभिमुख प्रकल्प राबविता येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भोसरी मतदारसंघातील 27 हेक्‍टर गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावात विकासाची गंगा येणार असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.