अमोल गायकवाड
जुन्नर – तत्कालीन फडणवीस सरकारने नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड रद्द करून थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्यात आली होती. त्यानंतर सत्तांतर होत महाविकास आघाडीने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड रद्द करून पुन्हा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष सुरू केले. मात्र, आता महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे फडणवीस सरकारचा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय पुन्हा लादला जाणार का, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
जुन्नर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत निघाल्यानंतर सर्वांचे लक्ष मतदार यादी प्रसिद्धी व निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लागले होते. जुन्नर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची अंतिम मतदार यादी मंगळवारी (दि. 5) प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणीस जोरदार सुरूवात केली होती; परंतु राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या निवडणूका जाहीर केल्या; मात्र यात जुन्नर नगरपालिकेचा समावेश नसल्याने निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार की पावसामुळे आणखी काही महिने पुढे ढकलला जाणार याबाबत चर्चा रंगत आहे.इच्छुक उमेदवारांनी तर मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केली होती; परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने त्यांचीही निराशा झाली आहे.
जुन्नर नगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडला होता, तब्बल 337 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन मयत, दुबार नोंद तसेच बाहेरील असे 826 मतदार वगळण्यात आले. असे जरी असले तरीही या अंतिम मतदार यादीबाबत नाराजी कायम आहे.
राजकीय हेतूने एका प्रभागातील मतदारांची नावे अंतिम प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचे अकिफ इनामदार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जुन्नरमध्ये राहत नसूनही केवळ नातेवाइक असल्याने त्यांच्याही नावांचा समावेश राजकीय हेतूने मतदार यादीमध्ये केल्याचा आरोप माजी नगरसेवक अविन फुलपगार यांनी केला आहे. याबाबत प्रशासनाने कोणत्या कागदपत्रांच्या आधारे अशी नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केली याबाबत खुलासा करण्यात यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेमधून करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राजकीय पक्षापुढे उमेदवार निवडीचे आव्हान
जुन्नरमध्ये यापूर्वी झालेल्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्या प्रमुख पक्षांमध्येच प्रामुख्याने सामना राहिलेला आहे. महाविकास आघाडीमधील हे पक्ष एकत्र निवडणूक लढविणार का याबाबत अजूनही चित्र स्पष्ट झाले नसले तरीही स्थानिक निवडणूका स्वतंत्रपणे लढविल्या जातील, असे स्थानिक नेते मंडळींचे म्हणणे आहे. दरम्यान, यावेळी भाजपादेखील या निवडणुकीमध्ये ताकत आजमावणार असून कॉंग्रेस, मनसे, एमआयएम, रिपाइं, वंचित बहुजन आघाडी हे पक्षदेखील निवडणुकीच्या आखाडा लढविण्यासाठी सज्ज आहेत.
2016पासून होते असे बलाबल
जुन्नर नगरपालिकेसाठी डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 8, शिवसेनेचे 5 तर आपला माणूस आघाडीचे 3 व कॉंग्रेसचे 1 असे 17 नगरसेवक निवडून आले होते. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी जनतेमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शाम पांडे यांनी अपक्ष उमेदवार तथा शिवसेनेचे माजी गटनेते मधुकर काजळे यांचा थोड्या मतांनी पराभव केला होता. तर राष्ट्रवादीचे संतोषसिंह उर्फ बाबा परदेशी तिसऱ्या क्रमांकावर होते.