पिंपरी – महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि उपमहापौर तुषार हिंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. तसेच, त्यांचे आभार मानले.
भाजपतर्फे महापौर पदासाठी ढोरे यांना तर, उपमहापौर पदासाठी हिंगे यांना संधी देण्यात आली. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी ते मुंबईला गेले होते. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका शारदा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे आदी उपस्थित होते.
सध्या राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित भेटीदरम्यान शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत विस्तृत चर्चा होऊ शकली नाही. मात्र, शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबतचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.