17 क्रीडा प्रकारांसाठी “महापौर चषक'”

समितीचा निर्णय : डिसेंबर, जानेवारीत होणार स्पर्धा

पिंपरी – शहरातील महापालिका व खासगी शाळांमधील खेळाडूंसाठी येत्या डिसेंबर व जानेवारी महिन्यात महापौर चषक स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. विविध 17 क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्याबाबत क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या आज (शुक्रवारी) झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

समितीचे अध्यक्ष तुषार हिंगे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्‍त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्‌टूवार, संजय घुबे, प्रशांत पाटील, उप अभियंता चंद्रकांत मुठाळ, वि. की. वाईकर, अनुप फणसे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी सुनंदा गवळी, माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुंढे आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावरील विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जात असल्यामुळे स्पर्धेसाठी येणारे खेळाडू पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील असतात. या खेळांमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील खेळाडूंचा अत्यल्प समावेश असतो. परिणामी शहराबाहेरील खेळाडूंवर खर्च होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शालेय विद्यार्थी, खेळाडूंना यामध्ये अधिकाधिक सहभागी होता यावे, त्यांच्यावर खर्च व्हावा यासाठी 17 प्रकारांमध्ये महापौर चषक शालेय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची घोषणा तुषार हिंगे यांनी यावेळी केली.

यामध्ये फुटबॉल, हॉकी, खो खो, थ्रो बॉल, कबड्डी, योगा, बुद्धिबळ, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, हॅंडबॉल, जलतरण, मैदानी खेळ (ऍथलेटिक्‍स), स्केटिंग, कराटे, कुस्ती या खेळांचा समावेश आहे. डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीत स्पर्धा होणार आहेत. शहरातील विविध मैदानांवर या स्पर्धा होणार असून याठिकाणी आवश्‍यक सुविधा पुरविण्याच्या सूचना करण्यात आल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी समिती तयार करण्यात आली. यामध्ये क्रीडा अधिकारी, दोन क्रीडा पर्यवेक्षक, एक शिक्षण मंडळ पर्यवेक्षक, दोन क्रीडा शिक्षक, दोन सी.टी.ओ.चे अधिकारी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)