लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच आज बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेस, भाजप व समाजवादी पक्ष यांच्यावर टीकेची तोफ डागली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष स्वबळावर बहुमत प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मायावतींचा काँग्रेसवर निशाणा
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत काँग्रेसच्या निवडणूकपूर्व आश्वासनांना राज्यातील जनता भुलणार नाही असा घणाघात केला. ‘जर काँग्रेसने केंद्रात सत्तेत असताना दिलेल्या आश्वासनांच्या ५० टक्के आश्वासने जरी पूर्ण केली असती तर आज काँग्रेस सत्तेत राहिली असती. केंद्रासह देशातील बहुतांश राज्यातून काँग्रेसची पीछेहाट होण्यामागचे हेच प्रमुख कारण आहे.’ असेही त्या म्हणाल्या.
भाजप-सपा एकाच नाण्याच्या दोन बाजू
यावेळी बोलताना मायावती यांनी भारतीय जनता पक्ष समाजवादी पक्षावर निवडणुकांना धार्मिक रंग देत असल्याचा आरोप केला. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना निवडणुकांना धार्मिक रंग देण्यातच रस आहे असं देखील मायावती म्हणाल्या.
बसपा स्वबळावर लढणार
मायावती यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशात २००७ प्रमाणे बहुजन समाज पक्ष स्वबळावर बहुमतासह सत्तेत येईल असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशात चौरंगी सामना?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे २०२४ लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. निवडणूकपूर्व युती अथवा आघाडीची शक्यता दिसत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये राज्यात सत्ताधारी भाजप, काँग्रेस, सपा व बसपा असा चौरंगी सामना पाहायला मिळू शकतो.