Mayawati । बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘एक्स’ या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ‘राजे, महाराज, संत, गुरू आणि महापुरुष कोणत्याही समाजाचे आणि धर्माचे असले तरी नकारात्मक विचार नसून सकारात्मक विचारसरणीच्या नावाखाली कोणतेही राजकारण करू नये.’ असं म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
मायावतींनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “त्यांचे पुतळे बसवणे आणि त्यांचे नाव देणे इत्यादींचाही सकारात्मक दृष्टीकोनातून उपयोग झाला पाहिजे, आणि त्यामागे कोणत्याही प्रकारचा द्वेष आणि राजकीय स्वार्थ दडलेला नसावा, जो आता दिसत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
बसपा प्रमुखांनी लिहिले की, “महाराष्ट्राप्रमाणेच इतर कोणत्याही राज्यात पुतळा पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यामागे कोणतेही राजकारण नसावे, तर बरे होईल.” अस म्हणत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.\
दरम्यान, पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. या घटनेत कुठल्याही आरोपीला सूट न देता कठोर कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सर्व आरोपी सारखेच आहे. विरोधकांनी आमच्यावर गंभीर आरोप केले या आरोपावर आज चपराक बसली आहे.
आता आपटेची कसून चौकशी केली जाईल. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केलं तो प्रकार दुर्दैवी आहे. संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयदीप आपटेच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. मागील काही दिवसांपासून पोलिस जयदीप आपटेचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर त्याला बुधवारी रात्री कल्याणमधून ताब्यात घेण्यात आले आहे.