उत्तर प्रदेश – ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देखील निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप लावला असून निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मायावती यांनी हे आरोप लावले असून त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल मध्ये आज दोन सभा होणार आहेत. जर निवडणूक आयोगाला कारवाईच करायची होती तर त्यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासूनच निवडणूक प्रचारावर बंदी का लावली नाही?”
लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 19 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार मुदतीपूर्वीच थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारी झालेल्या “रोड शो’ वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
Mayawati: It is clear that PM Modi, Amit Shah and their leaders are targeting Mamata Banerjee, its planned targeting. This is a very dangerous and unjust trend and one which doesn’t suit the PM of the country. pic.twitter.com/ECytD8LmgV
— ANI (@ANI) May 16, 2019
तत्पूर्वी, निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्याचा प्रचार उद्या (गुरुवारी) रात्री 10 वाजता थांबवण्यात येईल अशी माहिती दिली. पश्चिम बंगालमधील डमडम. बारासात, बासिरहात, जयनगर, मथुरापूर, जदवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकात्ता या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 मे (रविवारी) मतदान होणार आहे. उद्या रात्री 10 वाजल्यापासून निवडणूक संपेपर्यंत या मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचार होणार नाही, या मतदारसंघांमधील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी थांबणार होता.