मायावतींनी दिला स्वबळाचा नारा

पोटनिवडणूकीत सपा-बसपा आघाडीचे भविष्य अंधारात

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत केलेले महागठबंधन करून देखील मनासारखे निकाल न लागल्याने बसपाच्या प्रमुख मायावती नाराज आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेशात 11 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत बसपा पुन्हा स्वबळावर लढणार असल्याचे समजते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महागठबंधनवर अवलंबून न राहता स्वबळावर निवडणूकीच्या तयारीला लागा, असा सल्ला देत मायावतींनी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सेंट्रल ऑफिसमध्ये सोमवारी मायावती यांनी निकालासंदर्भात आढावा बैठक घेतली होती. सपा सोबत आघाडी केल्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे मायावती यांनी बैठकीत स्पष्ट केले. निवडणुकीत यादवांची मते बसपाला मिळाली नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

निकालानंतर बसपाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या फिडबॅकनंतर मायावती यांनी बैठकीत सांगितले की, आघाडी केल्यानंतरही बसपाला मतदान मिळाले नाही. त्यामुळेच आगामी पोटनिवडणुकीत बसपा स्वबळावर लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसपाला 11 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर आता रिक्त झालेल्या जागांवर पुढील 6 महिन्यात निवडणुका होणार आहेत.

राजकीय तज्ज्ञांच्या मते पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा बसपाचा निर्णय धक्कादायक आहे. बसपाचा इतिहास पाहिल्यास पक्ष पोटनिवडणुकीत कधीच उमेदवार उभे करत नाही. 2018च्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवार उभे केले नव्हते तर सपाला पाठिंबा दिला होता. याच आधारावर लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा एकत्र आले होते. जर आता मायावतींनी पोटनिवडणूक स्वबळावर लढवली तर भविष्यात सपा सोबतच्या आघाडीवर शंका उपस्थित केली जाऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.