नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या 7 बंडखोर आमदारांची बसपा नेत्या मायावती यांनी आज पक्षातून हकालपट्टी केली. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी बसपाचे अधिकृत उमेदवार रामजी गौतम यांना या आमदारांनी विरोध केला होता. हे आमदार उत्तर प्रदेश्मध्ये विरोधी गटांमध्ये जाऊन मिळण्याची शक्यता असल्याचे वाटल्याने मायावती यांनी या आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली. आगामी विधान परिषदेच्या निवडणूकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी बसपाकडून भाजप अथवा अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना मतदान करेल, असेही मायावती यांनी सांगितले.
बसपामधून हकालपट्टी केलेले बंडखोर आमदार अन्य कोणत्याही पक्षामध्ये गेल्यास त्यांच्याविरोधात बसपाच्यावतीने पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. या आमदारांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येऊ नये, अशी सूचना पक्ष संघटनेला देण्यात आली आहे, असेही मायावती म्हणाल्या.
बसपाच्या 6 आमदारांनी बुधवारी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. हे आमदार समाजवादी पार्टीला जाऊन मिळण्याची शक्यता वाटायला लागली होती. बसपाचे राज्यसभेसाठीचे अधिकृत उमेदवार गौतम यांच्या अर्जावर असलेल्या आपल्या स्वाक्षऱ्या बनावट आहेत, असे प्रतिज्ञापत्रही या गटातील चार आमदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गौतम यांचा अर्ज स्वीकारला आहे. राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशातील 10 जागांसाठी 9 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.