लखनौ: बहुजन समाज पक्षाने हरियानातील दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टी या पक्षाशी असलेली राजकीय युती तोडण्याची घोषणा केली आहे. हरियानात आम्ही सर्वच जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत असे मायावती यांनी जाहीर केले आहे.
बसपा आणि जननायक जनता पार्टी यांच्यात विधानसभेसाठी आघाडी झाल्याची घोषणा दुष्यंत चौताला यांनी केली होती. पण काल रात्री मायावती यांनी या दोन पक्षांमधील जागा वाटप नीट झाले नसल्याचे कारण देत ही आघाडी मोडीत काढल्याची घोषणा ट्विटर अकौंटवर केली. या आधीच्या समझोत्यानुसार बहुजन समाज पक्षाने हरियानातील 90 पैकी 50 जागा लढवाव्यात आणि जननायक जनता पार्टीने 40 जागा लढवाव्यात असे ठरले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जननायक जनता पार्टीन आम आदमी पक्षाशी तर बहुजन समाज पक्षाने भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाशी आघाडी केली होती.