दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम्स हा विचित्र शैलीने गोलंदाजी करणारा गोलंदाज होता. त्यावेळी या शैलीवरून मतमतांतरे व्यक्त केली जात होती. त्याला किती यश मिळेल, यावरही साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्याने अफाट यश मिळवले. त्याने निवृत्ती घेतल्यावर त्याची शैली लोकांच्या विस्मरणातही गेली. मात्र, यंदाच्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत भारताची फिरकी गोलंदाज माया सोनावणे हिने पॉलची आठवण चाहत्यांना करून दिली.
महिला स्पर्धेच्या तीन संघांपैकी वेलॉसिटी संघाची ही गोलंदाज पॉलच्याच शैलीने गोलंदाजी करते. सुपरनोव्हाजविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौर व तानिया भाटीया यांची जमलेली जोडी फोडण्यासाठी दीप्तीने चेंडू मायाकडे सोपवला. तिलादेखील ही जोडी फोडता आली नाही. मात्र, तिच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे या दोन्ही फलंदाज अवाक् झाल्या.
हरमनने तिच्या गोलंदाजीवर चौकार फटकावले. मात्र, या प्रत्येक वेळी ती फलंदाजीचा पवित्रा घेत असताना तिला मायाने टाकलेला चेंडू कुठे पडेल व कोणत्या दिशेला वळेल याचा अंदाज लागत नव्हता. हे टी-20 क्रिकेट असल्याने धावांना महत्त्व आहे, तंत्राला नाही. त्यामुळेच मायाने टाकलेल्या दोन षटकांत 19 धावा निघाल्या. जागतिक क्रिकेटमध्ये राउंड आर्म शैलीने गोलंदाजी करणारे असंख्य गोलंदाज होते व आहेत.
पाकिस्तानच्या वकार युनुसपासून भारताच्या जसप्रीत बुमराहपर्यंत तर लसित मलिंगापासून मथिशा पथिरणापर्यंत पण कोलांटउडी घेण्याची ऍक्शन पॉल ऍडम्सनंतर थेट माया सोनावणेच्या गोलंदाजीतच पाहली जात आहे. अवघ्या 23 वर्षांच्या मायासमोर मोठी कारकीर्द असून, तिच्या याच शैलीने ती येत्या काळात जगभरातील नामवंत फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवेल, असा विश्वास मात्र निश्चितच वाटतो.