श्री खंडेरायाच्या चरणी मुख्यमंत्री शिंदे यांचे साकडे
जेजुरी गड विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही
जेजुरी – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बळ मिळू दे, शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे. तसेच महाराष्ट्रीय जनता सुखी होऊ दे, असे सकडे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या चरणी घातले. तसेच जेजुरी गड विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
मार्तंड देवस्थानच्या वतीने एकनाथ शिंदेंना घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच खंडोबाचा खंडा देखील एकनाथ शिंदेनी यावेळी उचलला. सासवड येथील शेतकरी मेळावा उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी साडेपाच वाजता जेजुरीत आगमन झाले.
येथील मुख्य चौकात कडेपठार मंदिराला बसवण्यात येणाऱ्या कळसाची पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, उपस्थित होते.
देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, ऍड. अशोक संकपाळ, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे यांनी त्यांचे स्वागत केले. देवदर्शन उरकून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले.