राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांचे शिष्टमंडळास आश्वासन
माळेगाव (वार्ताहर) – रामोशी समाज हा कायम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिशी असल्याने समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून समाजाला योग्य तो न्याय देऊ, असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामोशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
गोविंद बाग येथे पवार यांची भेट रामोशी समाजाचे नेते नानासाहेब मदने यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय मदने, मयुर खोमणे, दत्ता रुपनवर, सागर पवार यांनी भेट घेतली. यावेळी समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक यांना आद्यक्रांतीकारक म्हणून घोषीत करावे, बारामती येथे आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने वसतीगृह मिळावे, रामोशी समाजास राजकीय प्रतिनिधित्व मिळावे या मागण्यांचे निवदेन देण्यात आले आहे.
रामोशी समाज स्वातंत्र्य काळापासून उपेक्षित आहे. तालुक्यात सुमारे 45 हजार रामोशी समाज असुन या समाजास राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्यास समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो, असे समाजाचे नेते नानासाहेब मदने यांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन देण्यात आल्याचेही मदने यांनी सांगितले.