1 मे : लसीकरणात महाराष्ट्राची “दशा’

पाचव्या टप्प्याच्या पहिल्या दिवशीच गोंधळ आणि राजकारण

पुणे – पुणे महापालिकेच्या वाट्याला केवळ पाच हजारच लसींचा साठा आला असून पाचव्या टप्प्याच्या पहिल्या दिवशीच लसीकरणाचा गोंधळ उडणार आहे. दि. 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन याच दिवसापासून सर्वांना लस दिली जाणार असल्याचे केंद्राने जाहीर केले असले तरी साठाच उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारने मात्र पहिल्या दिवशी ते सुरू होणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे या राजकारणात लसीकरणाबाबत महाराष्ट्राची “दशा’ झाल्याची स्थिती पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे पासून अर्थात शनिवारपासूनच 18 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सगळ्या लसीकरण केंद्रांवर साहजिकच गर्दी होणार आहे. त्यामुळे एक तारखेपासून लसीकरण सुरू नाही, याची माहिती नागरिकांपर्यंत प्रशासनाला पोहोचवावी लागणार आहे. याशिवाय अनेक नगरसेवकांनी लसीकरण केंद्र उभारली असून यांच्यासाठीही एक मे हा दिवस गोंधळाचा ठरणार आहे.

राज्य सरकारकडून अद्याप कोणतीच गाइडलाइन्स आली नसल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेनेही त्यादृष्टीने काहीच तयारी केली नाही. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून महापालिकेला लसींचे डोस कमी मिळत असल्याने आधीच लसीकरण प्रक्रिया मंदावली आहे. त्यातून शुक्रवारी केवळ 5 हजारच कोविशील्डचा कोटा महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेकडे पहिल्या दिवसासाठी लसींचा पुरेसा साठाच उपलब्ध नाही आणि जो साठा आला त्याचे वितरण कसे करावे, असा प्रश्‍न महापालिकेतील अधिकाऱ्यांना पडला आहे.

यातही फ्लेक्‍स्‌चे राजकारण…
भाजपच्या काही नगरसेवकांनी ही परिस्थिती राज्य सरकारमुळे ओढवल्याचे फ्लेक्‍स लावून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पुढाकाराने प्रभागात सुरू केलेल्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण एक मे पासून सुरू होणार नाही; राज्य सरकारकडून पुढील माहिती आल्यावर नक्की आपल्यापर्यंत कळवण्यात येईल, असा मजकूर असलेले फ्लेक्‍स लावण्यात आले आहेत. केंद्राकडून लस कमी मिळत आहे, हे कबूल न करता राज्य सरकारमुळे ही लस एक तारखेपासून वितरित होणार नाही, हे सांगून राजकारण करण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.