नवी दिल्ली – देशात शुक्रवार सकाळपासून 24 तासांत 63 हजार 631 बाधित करोनामुक्त झाले. एका दिवसात रूग्ण बरे होण्याचे ते विक्रमी प्रमाण ठरले. त्याशिवाय, एका दिवसात 10 लाखांहून अधिक करोनाविषयक चाचण्या घेण्याचा महत्वपूर्ण टप्पाही देशाने प्रथमच ओलांडला.
देशात एका दिवसात सर्वांधिक 69 हजार 874 नवे करोनाबाधित आढळले. बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असली तरी बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि घटणारा मृत्यू दर देशासाठी दिलासादायक ठरत आहे. आतापर्यंत देशातील 22 लाख 22 हजारांहून अधिक बाधित करोनामुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 74.69 टक्के इतके आहे. देशातील सक्रिय बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या 15 लाखांनी अधिक आहे. सक्रिय बाधितांचे प्रमाण 23.43 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
देशातील करोना मृत्यूदर आणखी घटून 1.87 टक्के झाला आहे. मागील काही दिवसांपासून करोनाविषयक चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 44 लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.