संशोधनात सापडली मावकर मुकादमांची समाधी!

इतिहास संशोधक प्रा. प्रमोद बोराडे, डॉ. प्रिया बोराडे यांचे संशोधन

कामशेत – मावळ तालुक्‍यात शिवकालातील आंदर, पवन व नाणे मावळ समाविष्ट होतात. यातील गावांचे ढोबळमानाने तीन प्रकार मध्ययुगात करण्यात आले आहेत. यामध्ये मौजे, कसबे व शहर अशा वर्गीकरणात नाणे मावळमधील माऊ हे मौजे माउ (सध्याचे आंदर मावळातील माऊ) म्हणून संबोधले जाते.

इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे व इतिहास संशोधिका डॉ. प्रिया बोराडे या दोघांच्या संशोधनात्मक स्थलचिकीत्सा करून बांधावरील मावकर पाटील यांची समाधी उजेडात आली आहे. समाधी विषयक आधिक माहिती देताना प्रा. डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले की, प्रस्तुत समाधीची मांडणी थोड्या वेगळ्या धाटणीची असून, साधारणतः बहुतांश समाधीवर असलेल्या शक या कालगणनेचा उल्लेख यावर केला गेला नाही. कोरण्यासाठी जागेची कमतरता नसताना शक वा इतर कोणतीही कालगणना यावर अनावधानाने लिहायची राहिली असावी वा अकुशल पाथरवटाने हा कोरला असण्याचा संभव आहे. समाधीचे स्वरूप, लिपी आणि रचना मध्ययुगातील असल्याने खंडेराव दाभाडे यांच्याआधी मौजे माउ येथील मावकर यांच्याकडे मुकादमी (मुलकी पाटीलकी) असण्याची दाट शक्‍यता आहे.

मावकर (नाणे मावळ) मंडळी लढाऊ बाण्याची होती. स्वराज्यसेवेत त्यांनी बरेच वर्ष सेवा दिल्याचे दिसते. लोहगड दुर्गावर मराठी योद्‌ध्यांपेकी मावकर नाव येते.

कोकणातील सुवर्णदुर्ग (हर्णेबंदर) येथे लढाऊ योद्धे आवश्‍यक असल्याने 1755 साली नानासाहेब पेशवे यांनी लोहगडहून पाठविलेल्या योद्‌ध्यांत गोरोजी मावकर हे होते. माउ या गावावरून येथील रहिवाशांना मावकर हे आडनाव प्राप्त झाले असावे.

मावळ तालुक्‍यातील गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी शेतात, बांधावर किंवा इतरत्र काही लिखित बाबी दिसल्यास त्याची माहिती कळवावी, असे आवाहन डॉ. बोराडे यांनी केले. पुढील काळात नाणे व आंदर मावळचा इतिहास नव्याने उलगडणार असल्याचे डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले.

पाच ओळीचा शिलालेख
श्री जईत पा (पाटील) (यांचे) वा(वडील) नावजी पा (पाटील) मावकर मोकदम (मुलकी पाटील) मौजे माऊ तर्फ नाणे मावळ.

Leave A Reply

Your email address will not be published.