Vidhan Parishad Election 2024 । राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज 12 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हीसमोर मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान दोहोंकडच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार किंवा जास्त मतांची गरज भासणार आहे, असे दिसते. तर महायुतीला आपला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची गरज भासणार आहे. या मतांची जुळवाजवळ नेमकी कशी होणार? यात अपक्ष आमदारांचे महत्त्व किती? कोण पडद्याआडून मतदान करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात नुकत्याच फुटलेल्या पक्षातील आमदार कुणाच्या बाजूने निर्णय घेणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
अशात विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेलं विधान चांगलाच चर्चेत आले आहे. काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार असं वक्तव्य गोरंट्याल यांनी केलं होतं. या वक्तव्यावर ते आजही ठाम आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’मी काल जे वक्तव्य केलं त्यावर आजही ठाम आहे. मी माझं वक्तव्य बदलणार नाही. मी काल काही आमदारांबाबत संकेत दिले होते आणि त्याचा आज आम्हाला फायदा झाला. मी काही आमदारांबाबत संकेत दिले होते, त्यापैकी दोन आमदार आज आमच्या पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. मी केवळ तीर मारला आणि माझा नेम अचूक लागला. आम्ही आणखी दोन आमदारांची वाट पाहत आहोत. मात्र मतदानापर्यंत काय होईल काय नाही याबाबत आत्ताच अंदाज वर्तवता येणार नाही.’