पिंपरी – लोकसभा निवडणूक निकालासाठी आता मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे, मतमोजणीची तयारीही निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी उमेदवार प्रतिनिधींची बैठक घेऊन मतमोजणीच्या नियमांची माहिती दिली. उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोरच “स्ट्रॉंग रुम’चे सील उघडण्यात येणार असल्याने उमेदवार प्रतिनिधींनी सकाळी सहा वाजताच त्यांना निवडणूक विभागाने दिलेल्या ओळखपत्रासह हजर राहणे गरजेचे असल्याच्या सूचनाही कविता द्विवेदी यांनी दिल्या.
मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतमोजणी कक्षात प्रतिनिधीने मोबाईल आणू नये, ओळखपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रतिनिधीला आपल्या विधानसभा मतदारसंघातील मोजणी सोडून दुसऱ्या मतदारसंघातील मोजणीकडे जाता येणार नाही. उमेदवाराच्या प्रतिनिधीने एकमेकांचा पास वापरल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. एकदा मतमोजणी कक्षात प्रवेश केल्यास बाहेर पडता येणार नाही. बाहेर पडल्यास पुन्हा आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या आहेत.