पवनानगर : पवना नदीपात्रात ब्राम्हणोली येथे पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार (दि. ३) रोजी सकाळच्या सुमारास घडली. त्यानंतर त्याचा मृतदेह शोधण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
शिवदुर्ग व वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या सदस्यांनी दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढला. कृष्णा भाऊ कालेकर (वय 17) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे आहे. त्याच्या पश्चात वडील, आई व आजी असा परिवार असून एकुलता एक असलेल्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने कालेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या युवकाचा शोध घेण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यु टीम व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे महेश मसने, राजेंद्र कडु, कुणाल कडु, हर्षल चौधरी, रतन सिंग, आकाश घरदाळे, वैष्णवी भांगरे, सागर कुंभार, दक्ष काटकर, यश वाडेकर, सचिन वाडेकर, अनिल आंद्रे, ओंकार कालेकर, सुनिल गायकवाड आदींनी अथक परिश्रम घेतले.
तर या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विजय गाले, पोलिस कॉन्स्टेबल संतोष शेळके हे करत आहे.