तळेगाव दाभाडे – विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिवट गावच्या माजी उपसरपंचासह दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमाटणेगाव बैलजोडी कमानीसमोर शिरगाव रोड येथे करण्यात आली.
मारुती बाळू लोखरे (वय 43, रा. दिवट, ता. मावळ, जि. पुणे) असे दिवट गावच्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. त्याच्यासह अतुल प्रकाश देशमुख (वय 26, रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा, ता. मावळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी परिसरात गस्त घालत होते. पोलीस अंमलदार निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना माहिती मिळाली की, एक इसम सोमाटणे गाव बैलजोडी कमानीसमोर बसलेला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अतुल देशमुख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत देशमुख याच्याकडे पिस्तूलबाबत चौकशी केली.
त्यामध्ये जप्त केलेले पिस्तूल मारुती लोखरे याने त्याच्याकडे ठेवण्यास दिले असल्याचे देशमुख याने सांगितले. लोखरे याला पोलिसांनी सोमाटणे फाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी या प्रकरणी 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोखरे हा मावळ तालुक्यातील दिवट गावचा माजी उपसरपंच आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार निशांत काळे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली.