लोकसभेचा आखाडा : युती-आघाडीमध्ये रस्सीखेच; लक्ष्मण जगताप, जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक


-रोहिदास होले

पिंपरी – राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्यानंतर अखेर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीवर शिक्‍कामोर्तब झाले. युती आणि आघाडीने “खुणगाठ’ बांधल्यानंतर मित्रपक्षांची जमवाजमव सुरू झाली आहे. युतीचा “बाण’ सुटल्यानंतर खासदार खुशीत असले तरी पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा जिंकण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादीने ठेवले आहे. त्यासाठी बारामतीसह मावळ आणि शिरुर काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सेना-भाजपने “युती’चा पेपर सोडविला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झालेली “गट्टी’ राजकीय गणिते बदलणारी ठरेल. खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहेत. आता “पालघर’च्या धर्तीवर मावळची जागा भाजपला मिळावा, याकरिता आमदार लक्ष्मण जगताप समर्थक एकवटले आहेत. त्यामुळे शिवसेनेला “लढाई’ सोपी राहिली नाही, हे तितकेच खरे आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मागील दोन टर्म “मावळ’वर सेनेचे वर्चस्व राहिले. 2009 मध्ये गजानन बाबर आणि 2014 ला श्रीरंग बारणे यांच्या रुपाने सेनेने विजयी पताका रोवली. आगामी निवडणुकांबाबत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभेच्या आखाड्यासाठी “ऍक्‍टिव्ह’ झाल्याचे अधोरेखित झाले आहे. राजकीय हालचाली पाहता लोकसभेची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षासाठी म्हणावी तितकी सोपी राहिली नाही.

खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित मानले जाते. तशी तयारीत बारणे यांची आहे. आपणच सेनेचा पुढचा खासदार होणार असा आत्मविश्‍वास बारणे बोलून दाखवत आहेत. त्यादृष्टीने खासदार बारणे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात कमालीचे “ऍक्‍टिव्ह’ झालेले दिसतात. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा घाटाखाली (पनवेल, उरण, कर्जत) वाढलेला जनसंपर्क नोंद घेण्यासारखा आहे.

विद्यमान खासदार इच्छुक असल्यामुळे सेनेकडून लोकसभेसाठी पक्षनेतृत्त्वाने दुसरा पर्याय शोधलेलाच नाही, त्यामुळे बारणेंना पक्षाकडून आपसूक “हिरवा कंदील’ मिळालेला दिसतो. 2009 पेक्षा 2014 मध्ये सेनेच्या उमेदवाराचा मतांचा टक्‍का सात टक्‍क्‍यांनी घटला आहे, याकडे सेना नेतृत्त्वाला विचार करायला लावणारा आहे.

युतीनंतरची राजकीय खलबते

मागील दोन टर्म शिवसेनेकडे असलेला मावळ खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. पार्थ पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते दौरे पाहता ते आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप पुन्हा “मावळ’च्या लढाईसाठी इच्छुक आहेत, असे त्यांच्या समर्थकांमधून दिसून येत आहे. गतवेळी जगताप यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या (मनसे) पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. 2014 चा सामना कमालीचा रंगतदार झाला होता. त्यावेळी सेनेचे श्रीरंग बारणे यांना जगताप यांनी झुंज दिली होती. श्रीरंग बारणे यांचा एक लाख 57 हजार 394 मतांनी विजय झाला. आता जगताप समर्थक नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मावळ भाजपला मिळावा, यासाठी वारंवार साकडे घालत आहेत. युतीनंतरही लक्ष्मण जगताप 2014 च्या पराभवाचे उट्‌टे काढण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे ते श्रीरंग बारणे यांना मदत करतील, हे शंकास्पद वाटत आहे.

पार्थ पवार विरूद्ध श्रीरंग बारणे?

सेना-भाजपची युती झाल्याने आघाडीला “मावळ’मध्ये विजयाची संधी असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. राष्ट्रवादीकडून तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू असली तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. मागील टर्मला सेनेतून बाहेर पडलेले राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. अखेर नार्वेकर बळीचा बकरा ठरले. त्यावेळी श्रीरंग बारणे (सेना), लक्ष्मण जगताप (शेकाप) आणि राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) यांच्यात प्रमुख लढत झाली. अन्य उमेदवार नावापुरते दिसले. राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे “घरचा’ उमेदवार देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. एकंदरीतच सेना आणि राष्ट्रवादीसाठी “मावळ’ची लढत सोपी राहिली नाही. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहे. घाटाखालच्या उमेदवारापेक्षा (पनवेल, उरण, कर्जत) घाटावरील (पिंपरी, चिंचवड, मावळ) उमेदवाराला पसंती देतील, असे दिसते. सध्याची राजकीय स्थिती पाहता पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात चुरशीची
लढाई दिसते.

राजकीय सरमिसळ असा मतदारसंघ

मावळ लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कोणत्याही एका पक्षाच्या छताखाली नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेला मतदारसंघ आहे. विरोधकांच्या मत विभाजनामुळेच मागील दोन टर्म शिवसेना वरचढ ठरली आहे. 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर लोकसभा लढविली होती. आताही त्यांचे समर्थक त्यांनी लोकसभा लढवावी, म्हणून प्रयत्नशील आहेत.
“या’साठीच करतात जगताप समर्थक दावा
“मावळ’कडे विधानसभानिहाय पाहिले, तर चिंचवड (लक्ष्मण जगताप), मावळ (बाळा भेगडे), पनवेल (प्रशांत ठाकूर) हे भाजपचे आमदार आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड, पिंपरी आणि उरणमध्ये सेनेचे अनुक्रमे ऍड. गौतम चाबुकस्वार आणि मनोहर भोईर प्रतिनिधीत्व करतात. ही निवडणूक सेनेसाठी अस्तित्त्वाची मानली जाते. तर सेनेचा विजयी अश्‍वमेध रोखण्यासाठी राष्ट्रवादीला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

राजकीय साटंलोटं : “मावळ’ भाजपला हवाय

पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित खासदार आहेत. 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या 29 हजार 572 मतांनी पराभव झाला. त्यामुळे सेना-भाजपच्या पक्षनेतृत्वामधील दरी रुंदावली होती. युतीच्या नव्या फॉर्म्युल्यामध्ये “पालघर’ची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. याशिवाय “मावळ’ची जागा आता भाजपला देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत मावळ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे “मावळ’ भाजपला मिळावे. याशिवाय युतीवर शिक्‍कामोर्तब झाल्यानंतर मंगळवारी (दि. 19) पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि “पालघर’च्या धरर्तीवर “मावळ’ भाजपला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

राष्ट्रवादी, लक्ष्मण जगताप, जयंत पाटील एकत्र?

मागील टर्मला आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करून शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळवली. दरम्यानच्या काळात शेकापकाडून लढलेले जगताप यांनी भाजपची वाट धरली. त्यात ते आमदार झाले. सध्या जगताप आणि बारणे यांच्यात टोकाचे वैर दिसते. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांनी राजकारणात “एन्ट्री’ करण्याचा चंग बांधला आहे. शिवसेना-भाजपची झालेली युती पाहता लक्ष्मण जगताप, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची “आघाडी’ झाल्यास युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगलाच घाम गाळावा लागेल, यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.