‘झेडपी’च्या अध्यक्षपदासाठी “मावळ आशावादी’

राजकीय : बदलत्या सत्तासमीकरणांमुळे सदस्यांच्या अपेक्षा उंचावल्या

वडगाव मावळ – जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी (दि. 19) मंत्रालयात होणार आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस अशी नवी आघाडी जुळून आली आहे. त्यामुळे कदाचित जिल्हा परिषद अध्यक्षपद मावळ तालुक्‍याला मिळेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची संधी अद्यापही मावळ तालुक्‍याला मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत 25 वर्षांनंतर सुनील शेळके यांच्या रुपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. आता मावळ तालुक्‍यात जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर शोभा कदम, कुसूम काशीकर आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष बाबुराव वायकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

अध्यक्षपदाची आरक्षण सोडत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मावळ विधानसभेच्या निवडणुकीत 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी सुनील शेळके निवडून आणल्याने मावळ तालुक्‍याला जिल्हा परिषद सदस्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मावळ तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते केवळ मंगळवारी (दि. 19) सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा करीत आहेत. तालुक्‍यात पुणे जिल्हा परिषदेचे पाच सदस्य असून, तीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, तर दोन भारतीय जनता पक्षाचे नितीन मराठे व अलका धानिवले आहेत.

मावळ विधानसभेचा उमेदवार निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्र पक्षाने महत्वाची जबाबदारी पार पडली. मावळ तालुक्‍यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावरच तालुक्‍याचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा मान मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.