लोणावळा – लोणावळ्यातील मध्य रेल्वेच्या क्रिकेट मैदानावर आगरी कोळी समाज बांधवांच्या वतीने सुरू असलेल्या हौशी क्रिकेट सामन्यादरम्यान खेळताना एका खेळाडूचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय 46, रा. असोलेगाव, नालासोपारा, पालघर) असे खेळाडूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी लोणावळ्यातील लोणावळा रेल्वेच्या मैदानावर कोकणातील आगरी कोळी समाज बांधवांच्या वतीने हौशी क्रिकेटच्या मैत्रीपूर्व सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञानेश्वर पाटील हे आगरी कोळी समाज क्रिकेट संघ, असोले यांच्या वतीने खेळत होते. खेळताना ज्ञानेश्वर यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते मैदानावरच कोसळले. हे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.